मनोर : पाच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या मासवन-नागझरी रस्त्याची दोन वर्षात दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे खड्ड्यांतून प्रवास करताना प्रचंड हाल होत आहेत. यामुळे संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.पालघर तालुक्यातील पूर्वेला मासवन-नागझरी या ८ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी २०१६ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ५.८५ कोटी रुपये मंजूर झाले होते. हे काम २०१७ ला सुरू करण्यात आले होते, परंतु या रस्त्याचे दोन्ही बाजूचे साईट पट्टी, मोºया आणि दिशादर्शक फलक याचे कामे आजही अपूर्ण आहेत. रस्त्यासाठी वापरलेला साहित्य (मटेरियल) निकृष्ट वापरल्यामुळे दोन वर्षातच पूर्ण रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आतापर्यंत दुचाकीस्वार पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच चारचाकी वाहनांचेही अपघात घडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणारे विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध यांचे प्रचंड हाल होत आहेत. नागझरी, निहे, वंदिवली, कटाळले, लोहरे, खारसेत ही गावे या परिसरात येत असून तेथील नागरिकांनी रस्त्याच्या कामात दर्जेदार साहित्य वापरले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार संबंधित विभागाकडे करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविण्यात सहभागी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून मासवण, काटाळे, लोवरे आणि निहे ग्रा.पं.नी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
।गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, शालेय मुले यांना या रस्त्याने प्रवास करीत असताना अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले नाही तर बससेवाही बंद केली जाईल. रस्ता खराब असल्याने वारंवार महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून निहे, नागझरी, लोवरे यांना निवेदने दिली जातात. रस्ता चालू केला नाही तर मासवन, पालघर मुख्य रस्त्यावर रस्ता रोको केले जाईल.- गणपत पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त कमिटी लोवरे> शासकीय अधिकाऱ्यांना रस्त्याचे फोटो पाठवले व पत्रव्यवहार केला आहे. ३ ते ४ ठिकाणी मोºया बांधणे बाकी आहे. हा रस्ता लवकरात लवकर चालू केला नाही तर धरणे आंदोलन छेडले जाईल.- संजय पवार, सरपंच, मासवन ग्रामपंचायत.