- शशी करपे, वसईमार्च अखेरपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी वसई विरार महापालिका आणि वसई तहसिल कार्यालयातून वसूलीची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दोन्ही विभागांनी नोटीसा बजावल्यानंतर आता जप्तीची कारवाई सुरु केली आहे. वसई विरार महापालिकेला २१६ कोटी रुपये मालमत्ता करापोटी येणे आहे. त्यापैैकी ८ मार्च अखेरपर्यंत ११३ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. तर वसई तहसिल कचेरीतून ८० कोटीचे उद्दीष्ट असून त्यापैैकी ३३ कोटी रुपयांची वसूली झाली आहे. वसूलीेचे जास्तीत जास्त उद्दीष्ट गाठण्यासाठी दोन्ही कार्यालयातून आता धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेचे मालमत्ता कर हे सर्वाधिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. गेल्या आर्थिक वर्षांत महापालिका आपले उद्दीष्ट गाठण्यात अपयशी ठरली होती. मागील आर्थिक वर्षांत १८७ कोटी रुपये मालमत्ता करापोटी येणे बाकी होते. त्यापैैकी मार्च २०१६ अखेरपर्यंत १०४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे यंदा मागील थकबाकीसह उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महापालिकेकडून धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेने नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. तर २ हजार ३५० थकीत मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. येत्या आठवड्यात थेट जप्तीची कारवाई सुुरु करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सदानंद सुर्वे यांनी दिली. महसूल खात्याने यंदा ८० कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले आहे. ७ मार्चपर्यंत ३३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. जमीन महसूल, गौण खनिज, मोबाईल टॉवर, वीटभट्टी, दगडखाणी, रेती, अकृषिक दंड या माध्यमातून महसूल विभाग दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर गोळा करीत असतो. वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सुट्टीच्या दिवशीही वसुलीचे कामे करीत आहेत. करवसुलीसाठी दहा पथके तयार करण्यात आली असून वसुलीचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, औैद्योगिक वसाहतीत मात्र, महसूल खात्याच्या कारवाईविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उद्योजकांनी वेदर शेड उभारल्या आहेत. त्यावर महसूल खात्याकडून दंड ठोठावण्यात आला आहे. लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटीसा त्यात कारखान्यांना टाळे लावण्याची धमकी महसूल अधिकारी देत असल्याने औैद्योगिक फेडरेशनचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष फ्रान्सिस फर्नांडीस यांनी तहसिलदारांची भेट घेऊन अन्यायकारक कर वसुलीची मोहिम थांबवण्याची मागणी केली. मात्र, वेदर शेडचा दंड भरावाच लागेल असे सांगत तहसिलदार पाटोळे यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली आहे. याआधी महसूल खात्याने कधीच वसूली केली नाही. ही वसुली थांबली नाही तर कारखानदार कारखाने बेमुदत बंद ठेऊन आंदोलन करतील, असा इशारा फर्नांडीस यांनी दिला आहे.चालू वर्षा अखेरीस २१६ कोटींचे टार्गेटचालू वर्षा अखेरीस २१६ कोटी रुपये मालमत्ता करापोटी अपेक्षित आहेत. मात्र, ८ मार्चपर्यंत ११३ कोटी रुपयांची वसूली झाली होती. नोटांबदीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तीस कोटी रुपयांच्या आसपास वसुली झाली होती.तर नोव्हेंबर २०१५ या महिन्यात अवघी १३ कोटी ३० लाख रुपयांची वसुली झाली होती. नोटाबंदीमुळे यंदाच्या वर्षी वसुलीची आकडेवारी वाढली आहे. पण, ८ मार्चपर्यंत अवघी ५१ टक्के वसुली झाल्याने वर्षअखेरपर्यंत महापालिका किती वसूली करते याकडे सगळ््याचे लक्ष लागून राहिले आहे.
वसई-विरारमध्ये ‘मिशन महसूल’
By admin | Published: March 11, 2017 2:12 AM