मंगेश कराळे
नालासोपारा - पालघर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेकडून मनपाच्या शासकीय कार्यालयात निवडणुकीचे कामकाज करून गैरवापर केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी झाला असून सोशल मीडियावर फोटो वायरल झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे अनेक पक्षांच्या नेत्यांनी निषेध दर्शवला असून गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महानगरपालिका स्थापन झाल्यावर अनेक गावांच्या ग्रामपंचायत कार्यालये मनपाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कामकाज करण्यासाठी विभागीय कार्यालये सुरू केली होती. गिरीज गावातील मनपाच्या विभागीय कार्यालयात बुधवारी सकाळी बविआच्या नगरसेविका अनिता पापडे आणि त्यांचे कार्यकर्ते महाआघाडी व बविआ पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बळीराम जाधव यांचे निवडणुकीचे कामकाज, मतदारांच्या स्लिपांची छाननी करत असल्याचे एका स्थानिक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये फोटो कैद केले आहे. गुरुवारी हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यावर याप्रकाराला वाचा फुटली आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून सत्ताधारी गैरवापर करत असल्याचा आरोप विवेक पंडित यांनी केला आहे तर मी वसईकर या संघटनेचे पदाधिकारी मिलिंद खानोलकर यांनी वसईमध्ये आता लोकशाही धोक्यात नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकाराची माहिती मिळाली असून आचार संहिता पथकाचे प्रमुख्य डॉ किशोर गवस यांना सदर ठिकाणी पाठवले असून प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुढची कारवाई करणार. - डॉ दीपक क्षीरसागर (प्रांत, वसई)
घडलेला प्रकार मला कळला असून संबंधितावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार. - रवींद्र फाटक (पालघर संपर्क प्रमुख, शिवसेना)