वसई : मुंबईतील एका बिल्डरने वसईतील आपल्या मित्राच्या घरातून साथीदारांसह १४ लाखांची रोकड आणि १७ लाखांचे दागिने लुटून नेले होते. मात्र, तुळींज पोलिसांनी त्याचा १३ दिवसांत उलगडा करून सहा जणांना बेड्या ठोकल्या व मुद्देमालही जप्त केला आहे.वसईतील एव्हरशाईन नगरात असलेल्या कमलकिशोर अरोरा यांच्या स्काय हाईट्स या इमारतीतील निवासस्थानावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी कुरीयर बॉय असल्याचे सांगून घरात प्रवेश मिळवला होता. मोलकरीण डॉलीदेवी चंद्रबन्सी (३५) आणि तिचा मुलगा आदित्य यांना बंदुकीचा धाक दाखवून बेडरूममध्ये बांधून ठेवले होते. त्यानंतर घरातील रोख रक्कम १४ लाख ५० हजार आणि १७ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पलायन केले.२२ आॅगस्ट रोजी दुपारी ४च्या सुमारास झालेल्या दरोड्याचा तपास करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्यासह पोलिसांचे पथक तयार केले.यातील प्रमुख आरोपी विजय प्रकाश आदमाणे (३२) हा व्यवसायाने बिल्डर व कमलकिशोर मित्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला गोरेगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर सागर शिवाजी सांडवे (२६, कुर्ला), योगेश अशोक शेडगे (२८, डोंबिवली), फुलकीत उर्फ पुल्ली पप्पू ठाकूर (२०, ठाणे), देवेंद्र उर्फ कन्नू सदाशिव सुगावे (१९, दिवे रोड कोपर) आणि अरुण सदाशिव सुगावे (२४, दिवे रोड कोपर) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दागिने तसेच दरोड्यासाठी वापरलेली बंदूक आणि गाडीही जप्त केली.
मित्राच्या घरी दरोडा, बिल्डरला अटक, मुद्देमाल जप्त; पोलिसांनी १३ दिवसांत केला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:54 AM