- मंगेश कराळे नालासोपारा - केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वसई येथील विराट सभेला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक आणि एकदिलाने करत असलेले काम पाहून बविआच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलेले आहे. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, अशा शब्दांत भाजपचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना प्रतिउत्तर दिले. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा त्यांनी माफी मागावी. नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक ठेकेदाराकडून २० कोटी रुपये जमा करण्यास पालिका अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भाष्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वैयक्तिक टीका केली होती. त्यांच्या या आरोपांतील निराधारता; किंबहुना आमदार ठाकूर यांच्या माध्यमातूनच शहरात कशापद्धतीने गैरव्यवहार सुरू आहेत, याची माहिती देण्याकरता भाजपच्या वतीने गुरुवारी नालासोपारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मनोज पाटील यांनी आमदार ठाकूर यांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांच्या आरोपांतील फोलपणा दाखवून दिला. आमदार ठाकूर हे बविआ हा पक्ष समजत असले तरी ती एक संघटना आहे. त्या संघटनेचा स्वत:चे चिन्ह नाही. या संघटनेचा दोन खाड्यांपुरता आवाका आहे. त्यांच्या या सीमितपणावर उपमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही राजकीय स्वरूपाची होती. पण या टीकेला आमदार ठाकूरांनी वैयक्तिक टीकतून उत्तर दिले आहे. त्यातून त्यांना आलेली वैफल्यता दिसून येते. पालकमंत्र्यांवरील खंडणीचे आरोप तर हास्यास्पद आहेत.
निवडणूक काळात अनेक पक्ष विविध औद्योगिक-सामाजिक संघटना आणि समाजातील घटक आणि व्यावसायिकांना भेटत असतात. त्यांच्यासोबत बैठका घेत असतात. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांना या बैठका किंवा या संघटनांसोबतचा संवाद दिसला नाही. त्यांना केवळ कंत्राटदारच कसे दिसले? त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचेच कसे दिसले? असा प्रश्न मनोज पाटील यांनी केला. कदाचित वर्षभर आमदार ठाकूर अशाच पद्धतीने खंडणी वसूल करत असतात. त्यामुळे या बैठकांतून आपल्यासारखीच कुणी तरी खंडणी वसूल करत आहे, अशी पाल त्यांच्या मनात चुकचुकली असावी, त्यातून त्यांनी हा आरोप केला असावा, अशी शंका त्यांनी या वेळी व्यक्त केली.
वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल पाटील उपस्थित होते.