तलासरी - तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही ना रिलायन्स ना शासनाचे अधिकारी दाद देत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तलासरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. शुक्रवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता. त्यामुळेच महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रुपये मिळत आहेत. तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्यासाठी संपादित जमिनीला 59 हजार रुपये असा अल्प मोबदला दिला जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मोबदल्यातील तफावतीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या. राजकारण्यांचे दरवाजे झिजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली व शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले.
जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला व रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तलासरीजवळ दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी शासनाच्या वतीने तलासरीचे नायब तहसीलदार नरेंद्र माने यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको माघे घेण्यात आला. शासनाला व रिलायन्सला इशारा दे यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. मात्र दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन् ची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे. मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून पेटवले. पण पोलिसांनी तात्काळ ते दूर केले यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.