वसई: वसई विरार शहर महापालिका प्रशासन आयोजित परिवहन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पालिका आयुक्त आम्हाला वेळ द्या, अशी आरडाओरड मनसैनिकांनी केली. त्यावेळी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसई पूर्वेला असलेल्या वसंत नगरी मैदानावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.
वसईत मंगळवारी दुपारी वसई विरार महापालिका प्रशासनाने परिवहन बसेसचे उद्घाटन लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना अचानकपणे मनसैनिक आक्रमक झाले. मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातच राडा केला. पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना यावेळी बेदम चोप देत तिथून कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
एकाच सेवेचे बविआ व शिवसेनेने केलं उद्घाटनवसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरुन बहुजन विकास आघाडी व शिवसेनेचं राजकारण या निवडणुका डोळ्यासमोर पाहून सुरू झालं आहे. खरं तर लॉकडाऊनच्या काळात हीच परिवहन सेवा पूर्णपणे बंद झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करुन ही बस सेवा सुरू केली होती. आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करत, या परिवहन सेवेचे नुतनीकरण व लोकार्पण सोहळा वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार रवींद्र फाटक पालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी व वसईतील शिवसैनिकांनी मोठी उपस्थित लावली होती.