वाडा : तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत असून येत्या दोन महिन्यांत त्यांच्या निवडणूका प्रस्तावित आहेत. त्यासाठी २९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यातील प्रचंड घोळ व चुका दूर करा तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांच्या हरकतींसाठी दिलेली ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत एक आठवड्याने वाढवा अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यामध्ये ज्या प्रभागामध्ये मतदाराचे निवासस्थान आहे, त्या प्रभागाऐवजी दुसºयाच प्रभागाच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली असता ती तशीच ठेवणे, काही गावाच्या मतदार यादीत तर दुसºया गावातील व परप्रांतीय मतदारांची नावे समाविष्ट करणे अशा प्रकारच्या चुका मोठ्या प्रमाणावर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ४ सप्टेंबरपर्यंतच्या हरकत मुदतीत पाच दिवस मिळत आहेत. त्यात दोन दिवस गौरी गणपतीचे सणासुदीचे असून दोन दिवस सुट्टीचे आहेत. त्यामुळे हरकतींची मुदत किमान एक आठवड्याने वाढविण्यात यावी योग्य ती कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवडणूकीपूर्वी मतदार याद्या सुधारा, शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 5:12 AM