विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांमध्ये फुलशेती केली जात असून, त्यात मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्यातील खांड, ओंदे, उघाणी, वाकी, पोचाडा, साखरा, अशा ४० ते ५० गावांत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये मोगरा लागवड केली आहे. मात्र, त्याच वेळी मोगऱ्यावर पडलेल्या पीन बोरर रोगामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. या संदर्भातील तक्रारींनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.
सध्या मोठ्या प्रमाणात दररोज मोगरा कळी काढली जात आहे. विक्रमगडची मोगरा कळी दादर व नाशिकच्या मार्केटला जाते. सद्यस्थितीत या फुलांची मागणी जरी वाढली असली, तरी थंडी सुरू झाल्याने मोगऱ्याचे उत्पादन काही प्रमाणात घटले आहे, तसेच पीन बोरर रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
मोगरा कळी तयार होण्याचा कालावधीदरम्यान मोगरा कळीमधे लहान शेंद्री अळ्या तयार होऊन पूर्ण पीक वाया जाते. ज्या शेतकऱ्यांचे ८ ते १० किलो मोगऱ्याच्या कळीचे उत्पादन व्हायचे, तिथे थंडीमुळे व रोगामुळे उत्पादन कमी झाले आहे. या रोगाची कृषी विभागाचे कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील कीड व रोग शास्त्रज्ञ ढाणे व कृषी विभागाचे आर.यू. इभाड, कृषी सहायक एच.एन. गिरासे, एस.एस. गावित, माळगावी, ए.एस. भोडवे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.