रविंद्र साळवे / मोखाडाया तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनासाठी पुरविले जाणारे धान्य किडके, फळे सडकी, मसाले कुजके असल्याने कुपोषण नष्ट करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या भोजनातूनच कुपोषण वाढीस लागण्याची व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात कुपोषणाची समस्या गंभीर असल्याने शाळेत असतांना या लहानग्यांना पोषक आहार मिळावा म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च होत आहेत. मात्र, धान्याच्या सुमार दर्जामुळे पालकांमधुनही संताप व्यक्त होत आहे.मोखाडा तालुक्यात १५८ प्राथमिक आणि ४८ उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत ७ हजार ८४७ मुले आहेत तर इयत्ता सहावी ते आठवी पर्यंत ३ हजार ५०५ मुले आहेत. एकंदर ११ हजार ३३५२ मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, गळतीचे प्रमाण थांबावे यासाठी २००१ पासून शासन मध्यान्ह भोजनाची महत्वकांक्षी योजना राबविते. परंतु, भोजन साहित्य पुरवठा करणारे ठेकेरदार स्वत:चा आर्थिक फायदा साधण्यासाठी अत्यंत हिन दर्जाच्या धान्याचा, भाजीपाला व फळांचा पुरवठा करतात. तसेच या गलथान कारभाराकडे शिक्षण विभागाचा काणाडोळा असल्यामुळे या योजनेलाच हरताळ फासला जात आहे.नुकतेच तालुक्यातील मोरखडक जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट तांदळाचा पुरवठा केला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दर्जाहिन धान्यामुळे आदिवाशी मुलांच्या जीविताशी खेळ मांडला जात असल्याने यावर कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोखाड्यात माध्यान्ह भोजनातूनच कुपोषण
By admin | Published: December 26, 2016 6:05 AM