सुनील घरत - पारोळ : अक्षयतृतीया हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून, या दिवशी कार्य करणे शुभ मानले जाते. खासकरून लग्न सोहळे याच दिवशी करण्याचा वधू-वर पित्यांचा मानस असतो. या दिवशी सगळीकडे लग्नाची धूम असते, पण कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही लग्न सोहळ्यांवर निर्बंध असल्याने आता पुढल्या वर्षी अक्षता टाकू, असे सांगत अनेक वधू-वर पित्यांनी लग्न सोहळे लॉकडाऊन केले असल्याने या वर्षी लग्नासाठी शुभ असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे.मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही आहे. वसईत दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. तसेच मृत्यूचा दरही वाढला आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरल्याने मेमध्ये होणारे हे लग्न सोहळे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरणार असल्याने आपल्या कुटुंबाची व नातेवाइकांची काळजी घेत घरातील लग्नकार्ये अनेकांनी पुढे ढकलली आहेत. सध्याचे निर्बंध पाळून मोजक्या लोकांमध्ये होणारे लग्न सोहळे चांगली संकल्पना, पायंडा असल्याची भावना अनेकजण व्यक्त करीत आहेत.या वर्षी लग्नाचे सर्वाधिक १४ मुहूर्त मे महिन्यात आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नमुहूर्त नसल्याने, अनेकांनी मे महिन्यातील मुहूर्ताला प्राधान्य देत विवाह निश्चित केले होते. २२ एप्रिलपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत. वैशाख व ज्येष्ठ हे महिने विवाह मुहूर्तासाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे इच्छुकांचा हिरमोड झाला़. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरल्यास, कोरोना काळातील निर्बंध पाळून शुभमंगल सावधानता बाळगून कमी लोकांच्या उपस्थितीत हौसेला मुरड घालून लग्न करावे लागणार आहे; अथवा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.
मे महिन्यातील मुहूर्तमे महिन्यात अक्षयतृतीयेसह ८, १३, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ तारखेला तर जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत.
लग्न उरका दोन तासांत, नाहीतर भरा ५० हजार कोरोना प्रादुर्भावात लग्नसोहळ्यासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे प्रादुर्भाव कमी होताच ती १०० वर नेण्यात आली, पण आता कोरोनाची दुसरी लाट सक्रिय झाल्याने आता शासनाच्या नियमाने २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकावे लागणार आहे. तसेच विधी व अन्य कार्यक्रम दोन तासांच्या वेळेतच करावे लागणार आहेत. या नियमांचे पालन न केल्यास ५० हजारांचा आहेर सरकारला द्यावा लागणार आहे.
माझा मुलगा निशांतचे लग्न असल्याने निमंत्रणही वाटले, पण कोरोनाच्या प्रादुर्भावात आमच्या जवळची माणसे गेली. ज्या समाजात आपण राहतो, तो समाजच जर संकटात असेल आणि आपल्या कार्यात हजर राहू शकत नसेल तर काय उपयोग? त्यामुळे माझ्या मुलाचे लग्न पुढे करायचे ठरवले आहे.- प्रकाश पाटील, वरपिता, शिवणसई
नियमांचा ठरतो अडसर विवाह समारंभ धूमधडाक्यात करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु, सध्या लॉकडाऊन काळात असलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा हिरमोड झालेला आहे. त्यामुळे अनेकांनी आपले विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले - लग्न म्हटले की, मंगल कार्यालय, आचारी, बँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावे लागते.nलग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यांसह रुखवत आदी वस्तू लग्न मुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदर खरेदी कराव्या लागतात. - मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्न सोहळे, यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्यांची वार्षिक आर्थिक गणिते बिघडली आहेत.