आशीष राणे वसई : सहकारी संस्थांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सहकारी संस्थांच्या मासिक तसेच तातडीच्या बैठका, सभा, त्यातून होणारे निर्णय व इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे आता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सहकारी संस्थांच्या बोर्ड मीटिंग घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंग किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर करण्यासंबंधीचे परवानगी देणारे एक परिपत्रक जारी केल्याची माहिती वसई उपनिबंधक योगेश देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात होऊ नये, त्यासाठी सरकार विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. त्या अनुषंगाने सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक, प्रवास पूर्णपणे बंद असल्याने सर्व सहकारी संस्थांच्या मासिक (बोर्ड) सभा घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असून अधिकारी-पदाधिकारी यांना सभेस उपस्थित राहता येत नाही. तर सहकारी संस्थांच्या उपविधीतील तरतुदीनुसार संचालक मंडळाची दरमहा मासिक बैठक घ्यावी लागते.परिणामी सहकार आयुक्तांच्या या परिपत्रकात म्हटल्यानुसार सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती विचारात घेता राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी लॉकडाऊनची परिस्थिती असेपर्यंत मासिक सभा व्हिडीओ कॉन्फरसिंग किंवा डिझिटल पर्यायांचा वापर करून घेण्यात यावी. मात्र सभेचा अजेंडा सर्व समिती सदस्यांना वेळेवर व्हाट्सअप किंवा ई-मेलद्वारे किंवा अन्य डिजिटल माध्यमातून मिळेल याची दक्षता सर्व सहकारी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सचिवांनी घ्यावयाची आहे. तसेच जे अधिकारी, पदाधिकारी सभेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, त्यांनी मात्र ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन होईल याची दक्षता घ्यावयाची आहे. तसेच मास्क घालूनच सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावयाचे असल्याचे सहकार आयुक्तांनी निर्देशित केले आहे.>परिपत्रक स्वागतार्हकोरोनामुळे सहकारी संस्थांवर ओढवलेल्या परिस्थितीतदेखील राज्याच्या सहकार आयुक्तांनी संस्थांच्या मासिक सभांसाठी प्रथमच डिजिटल पद्धतीला प्राधान्य देणारे काढलेले हे परिपत्रक नक्कीच मार्गदर्शक व स्वागतार्ह ठरेल. वसई तालुक्यातील सात हजारांहून अधिक छोट्यामोठ्या संस्था याचा अवलंब नक्की करतील, असा विश्वास वसई उपनिबंधक योगेश देसाई यांनी व्यक्त केला.
सहकारी संस्थांच्या मासिक सभा ‘डिजिटल’, सहकार आयुक्तांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 2:09 AM