आशिष राणेवसई : महापालिकेच्या अग्निशमन विभागात साधारणत: दोनशेहून अधिक पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून ही पदे तसेच अतिरिक्त कामाचा मोठा ताण या अग्निशमन दलावर पडतो आहे. दरम्यान, येथील कार्यरत जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सरळसेवेद्वारे भरती करण्यास पालिकेने अलीकडच्या सभेत संमती दर्शवली असली तरी अजूनही या भरतीसाठी प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.
राज्य सरकारच्या महा ई - पोर्टलद्वारे ही भरती होणार असल्याने पालिकादेखील ही शेकडो रिक्त पदे भरण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे महापालिका अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वसई - विरार शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या विस्तारामुळे अग्निशमन विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच साहित्यांनी अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात अग्निशमन विभागात विविध अत्याधुनिक उपकरणांसाठी ६७ कोटी ५६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आस्थापनाचा विषय घेतला तर आताही महापालिकेच्या अग्निशमन दलात एकूण २२६ पदे मंजूर असून त्यातील २०० पदेही न भरली गेल्याने ती रिक्त आहेत. त्यात अग्निशमन विमोचक (लिडिंग फायरमन) ची १३५ पदे मंजूर असून ती देखील रिक्त आहेत.
फायर आॅडिट म्हणजे काय? : हे अधिकारी संबंधित आस्थापनांची पाहणी करतात. आग लागू नये, म्हणून खबरदारी घेतलेली आहे का, आग लागल्यास सुरक्षित स्थळी जाण्यासाठी व सुटकेच्या मार्गात काही अडथळे आहेत का, अग्निरोधक यंत्रे सुस्थितीत आहेत का, तेथील कर्मचाऱ्यांना ही अग्निरोधक यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे का? या आणि अशा असंख्य बाबी काटेकोरपणे तपासून संबंधित इमारतीला फायर आॅडिट झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.मनुष्यबळाची कमतरता : वसई-विरार महापालिकेकडे विविध ठिकाणी मिळून अशी ६ अग्निशमन केंद्रे आहेत. यात एकूण २३२ कर्मचारी आणि अग्निशमन जवान असून एकूण १६ चारचाकी वाहने तर ७ अग्निशमन दुचाकी आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि पसारा पाहता त्याच्या तुलनेत जे आवश्यक मनुष्यबळ असायला हवे त्याची मात्र बºयापैकी कमतरता आहे.फायर ऑडिट करू शकणारी पदेच रिक्तपालिकेच्या अग्निशमन दलात अनेक अधिकारी तसेच कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये शहरातील मालमत्तांचे फायर ऑडिट करण्यासाठी जी अधिकारी दर्जाची पात्रता आणि अर्हता लागते त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.मुख्य अग्निशमन अधिकारी, स्थानक अधिकारी आणि उपस्थानक अधिकारी दर्जाचे अधिकारीच केवळ फायर आॅडिट करू शकतात. गेली अनेक वर्षे वसई - विरार महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी पद रिक्त होते. ते उशिरा भरले.