बोर्डी : तालुक्यातील बावडा नवापाडा येथील शैला गायकर या सत्तावीस वर्षीय आदिवासी महिलेचा व तिच्या बाळाचा शनिवारी प्रसूती दरम्यान मृत्यू झाला.शैला संजय गायकर यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्याने दुपारी अडीचला अॅबुलन्सने त्यांना चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. बाळाचा हात बाहेर आल्याने त्यांना आगार येथील उपजिल्हा रु ग्णालयात २.४० वाजता रवाना केले. चिंचणी ते उपजिल्हा रुग्णालय हे अंतर अंदाजे २० ते २५ किमी असून ४५ मिनिटांनी त्या तिथे पोहचल्या.मात्र तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच माता आणि नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही माहिती रु ग्णालय प्रशासनाने गायकर कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून, या घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल. या बाबत उपजिल्हा रु ग्णालयाचे डॉ. पी. भोये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
प्रसूती दरम्यान माता व अर्भकाचा डहाणूत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 3:53 AM