नालासोपारा : रस्त्यावर नाकाबंदीसाठी उभे असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण फिरणारे नागरिक दूध आणायला जातो, आई ॲडमिट आहे, मित्राला भेटायला चाललो आहे, स्मशानात जातो आहे, अशी कारणे सांगत असतात. यामुळे तसेच वसई तालुक्यात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. विनाकारण फिरणारे नागरिक वेगवेगळी कारणे सांगून नाकाबंदी असलेल्या पोलिसांना उल्लू बनवत असल्याने कोरोनाबाबतची दीड ते दोन मिनिटांची शॉर्ट फिल्म बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून जनजागृती करत पोलीस दलही कोरोना महामारीच्या संकटात पाठीमागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
मार्चपर्यंत आटोक्यात आलेल्या कोरोनाने एप्रिल महिन्यात मात्र पुन्हा डोके वर काढले होते. नालासोपारा, वसई, विरार या शहरांमधील बाजारात होणारी खरेदीसाठी गर्दी व इतर अन्य कारणांमुळे कोरोना प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यंदा गतवर्षीपेक्षाही मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी संसर्ग वाढीमुळे तालुक्याच्या अन्य ठिकाणी कुठेही रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. या परिस्थितीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे.
रस्त्यावर नाकाबंदीसाठी उभे असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण फिरणारे नागरिक दूध आणायला जातो, आई ॲडमिट आहे, मित्राला भेटायला चाललो आहे, स्मशानात जातो आहे, अशी कारणे सांगून पोलिसांना त्रास देत असल्याने शॉर्ट फिल्म बनवून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाबतची जनजागृती व्हावी या उद्देशाने तयार केली. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. पोलीस दलावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदार असते. कोरोना महाकाळात पोलीस हे पुढच्या फळीत आपले कर्तव्य बजावत आहेत.
पोलिसांचे आवाहन
कर्तव्य बजावताना राज्यात आतापर्यंत अनेक पोलिसांचा कोरोनामुळे बळीही गेला आहे. पोलीस दल संरक्षणाचे काम करीत असताना कोरोनाकाळात जनजागृतीचे काम करीत आहेत. या फिल्ममधून वाहतूक पोलीस निरीक्षक शेखर डोंबे, पोलीस कर्मचारी राजू गायकवाड, काका पाटील, महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विनाकारण फिरणाऱ्यांना स्वतःसाठी व परिवारासाठी तरी घराबाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे.