मुंबई - महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात आहे पण आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये लपूनछपून अंधश्रद्धेच्या नावाखाली विधी केले जातात. त्यामध्ये कुणाचा तरी बळी जातो. मुंबईपासूनच जवळच असलेल्या विरारमध्ये काळया जादूमुळे एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. सानिया बेकरे असे मृत मुलीचे नाव आहे. सानिया ब-याच दिवसांपासून बद्धकोष्ठाच्या आजाराने त्रस्त होती.
खरंतर सानियाला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. पण सानियाच्या आईने आणि काकीने आजारपणातून मुलीची सुटका करण्यासाठी काळया जादूच्या नावाखाली अघोरी विधी करुन मुलीचा बळी घेतला. श्वास गुदमरल्यामुळे आणि गुप्तांगावरील जखमांमुळे सानियाचा मृत्यू झाल्याचे जे.जे. रुग्णालयातील शवविच्छेन अहवालात म्हटले आहे. बेकरे कुटुंब विरार पूर्वेला मनवेलपाडा येथे आई जीवदानी प्रसन्न इमारतीमध्ये रहाते.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सानियाचा मृत्यू झाला. रविवार दुपारपर्यंत तिचा मृतदेह घरातच होता. सानियाचे काका संजय मोरे तिला संजीवनी रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सानियाला मृत घोषित केले. विरार पोलिसांनी मुलीची आई मीनाक्षी, वडिल अंबाजी आणि काकी माधुरी शिंदे यांना अटक केली आहे. पोलिसांनी सानियाच्या पालकांवर हत्येच्या 302 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना सानियाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. काळया जादूचे अघोरी विधी करताना सानियाच्या छातीवर उभे राहून तिच्या आईने नृत्य केले त्याचवेळी काकीने तिचे पाय पकडले होते. 14 डिसेंबरला बेकरे यांच्या घरातून किंकाळण्याचे आवाज येते होते असे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. मीनाक्षीने संपूर्ण शरीराला हळदीचा लेप लावलेला होता असे शेजारी राहणा-या गोसिया सलमानीने पोलिसांनी सांगितले.
मीनाक्षी घरामध्ये काळी जादू करायची असे इमारतीत राहणा-या रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. आपल्या बहिणीला आजारपणातून बरे करण्यासाठी आई आणि काकीने तिच्यावर काही विधि केले असे सानियाचा भाऊ यशने पोलिसांना सांगितले. तो 14 वर्षांचा आहे. हे सर्व घडत असताना आपले वडिल घरात हजर होते. पण त्यांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही असे यश म्हणाला.