लोकमत न्युज नेटवर्कमनोर: येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती साठी सावरे पाचूधार येथील आलेली २० वर्षीय आदिवासी माता व तिचे बाळ डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीने मृत्यूमुखी पडले. किर्ती किरण बोनड २० हिला प्रसूती साठी पहाटे २.३० च्या दरम्यान तिचे नातेवाईक आणि पतीने दाखल केले त्यावेळी तिथे कार्यरत असलेली नर्स कोमल कांबळे हिने तिची प्रसूती करण्यासाठी ओ पी डी मध्ये असलेल्या डॉ. गणेश धुमाळ यांना न सांगता ती स्वत: ती करण्याचा प्रयत्न करू लागली मात्र त्या महिलेची पहिली प्रसूती असल्याने तिची प्रकृती अति गंभिर होत गेली. त्या नंतर तिने प्रशिक्षणार्थी डॉक्टर निखील सोनावणे यांच्या लेखी शिफारसीव्दारे तिला ठाण्याच्या सिव्हीलमध्ये नेण्यास तिच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र तिची प्रकृती अति गंभीर होऊन रक्त श्राव होऊ लागल्याने तिला खाजगी रुग्णालया मध्ये दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री कार्यरत असलेल्या कांबळे यांनी वेळेचं काळजी घेतली असती व झोपलेल्या डॉक्टरांना उठवले असते तर अशी घटना घडली नसती. स्वत:ची हुशारी दाखविण्याच्या या नर्सच्या खटाटोपात त्या आदिवासी महिलेला बाळासह आपला प्राण गमवावा लागला.डॉ गणेश धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले मी रात्री ओपीडीमध्ये होतो. झोप लागली होती मला उठविले असते तर मी त्या महिलेवर उपचार केले असते. नाही तर लगेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये रेफर केले असते परंतु मला न उठवता त्या नर्स ने केलेल्या आगाऊपणामुळे हे घडले.सीपीएम अध्यक्ष सुदाम दिनडा म्हणाले की ग्रामीण रुग्णालय मनोर येथील डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे आज आदिवासी महिलेचे निधन झाले आहे अशा डॉक्टरांवर आमच्या पक्षातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल १०८ व १०२ क्र मांकाच्या रुग्णवाहिका कुठे आहेत? त्या नेमक्या अशा गरजेच्याच वेळी गायब असतात. त्या जातात कुठे याचा शोध घेऊन आणि उपयोगाच्या नसतील तर त्या कायमच्या बंद करून टाकू.त्यांच्यावर ही योग्य कारवाई केली जावी अशी मागणी करू. नर्सवर गुन्हा दाखल कराया दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नर्सवर प्रशासकीय कारवाई तर व्हायला हवीच. ती होत राहील सर्व प्रथम तिच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे आणि ओपीडीत असतांना ते ही रात्रीच्या वेळी झोपा झोडणाऱ्या डॉक्टरांवरही कामात हलगर्जी केल्याबद्दल कारवाई व्हायला हवी अशी मागणी आदिवासी बांधवांनी व मृतांच्या आप्तांनी केली आहे.
डॉक्टरच्या हलगर्जीने मातेचा बाळासह मृत्यू
By admin | Published: June 13, 2017 3:09 AM