नालासोपारा : नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी, याकरिता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकारचे उंबरठे झिजवत आहे. सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांच्या सुटकेकरिता प्रयत्न करावेत, अशी याचना त्यांनी सर्वांना केली आहे. याच मागणीसाठी संपदा यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते भेटले नसल्याने त्यांनी विनंती अर्ज दिला आहे.
विरारच्या मनवेलपाडा येथील वेदश्री सोसायटीत राहणाऱ्या संपदा यांचा मुलगा प्रणव हा ओएसएम फिल्ट मॅनेजमेंट या शिपिंग कंपनीत शेफ म्हणून नोकरी करतो. चेन्नईस्थित ही कंपनी नायजेरिया येथे क्रूड ऑइल काढणाऱ्या जहाजाला सेवा देते. प्रणव १८ जुलैला या कंपनीत कामाला लागला होता. ९ ऑगस्टपासून हे जहाज नायजेरियातील इक्वेटोरियोल गिनीमध्ये आहे. या ठिकाणी बेकायदा क्रूड ऑइल उचलले म्हणून हे जहाज नायजेरियामध्ये नजरकैदेत आहे. या जहाजावर एकूण २६ सिफेअर्स आहेत. त्यात १६ भारतीय असून त्यात प्रणवचाही समावेश आहे. त्यांना नायजेरिया-मेलाबो येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
गेले तीन महिने या सिफेअर्ससोबत गैरव्यवहार करण्यात येत आहे. त्यांच्याकडील फोनही काढून घेतले आहेत. प्रणवने ही माहिती आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून दिल्याची माहिती संपदा यांनी दिली. एकाच खोलीत जमिनीवर या सगळ्यांना बसवून ठेवलेले असून, त्यांची स्थिती बिकट आहे. यातील अनेक जण यामुळे आजारी पडलेले आहेत. त्यांच्यावर औषधोपचारही केले जात नाही. जहाज मालकाने दंड भरल्यानंतरही त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई कमी करण्यात आलेली नाही. नवी मुंबईतील ऑल इंडिया सिफेरस युनियनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना याबाबत पत्र लिहून या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती केली आहे.
झिजवतेय उंबरठेसंपदा शिंदे या मुलाच्या काळजीने स्थानिक नेते, मुख्यमंत्री आणि प्रसार माध्यमांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांच्या या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती केली आहे.