पालघर - पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेवेळी त्याचे वजन केवळ ५.६ किलो होते. शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखालील चमूने मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. काव्यच्या यकृताच्या जागी त्याच्या आईच्या यकृताचा काही भाग प्रत्यारोपित करण्यात आला. ही शस्त्रक्रिया तब्बल १४ तास चालली आणि आता काव्यची प्रकृती सुधारली असून, त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.नऊ महिन्यांच्या काव्यला जन्मापासूनच यकृताचा बिलिअरी आर्टेसिया हा आजार झाला होता. या आजारामध्ये यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. दोन महिन्यांचा असताना या बाळावर मुंबईतील एका रुग्णालयामध्ये एक मोठी शस्त्रक्रिया (पोर्टो-एंटरेस्टॉमी) करण्यात आली. ती अयशस्वी झाली आणि त्याच्या यकृताचे कायमचे नुकसान झाले. त्याच्या यकृताला लिव्हर सिºहॉसिस हा आजार झाला. त्यामुळे त्याची वाढ खुंटली. त्याचे वजन ५.६ किलोपर्यंत येऊन थांबले. त्याला कावीळ झाली आणि पोटात पाणी साचले, तसेच दोन प्रकारचे प्राणघातक संसर्ग झाले होते.काव्यचे वडील विवेक आणि आई निशा हे दोघेही वयाच्या तिशीत असून, रोजंदारीवर काम करतात. त्यांनी काव्यला मुंबई सेंट्रल रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. शल्यचिकित्सक डॉ. गौरव गुप्ता यांनी सांगितले की, काव्याची आईची अलीकडेच प्रसूती झाली, असे असूनही तिने पुढाकार घेऊन यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शविली. या शस्त्रक्रियेनंतर तिचीही प्रकृती आता सुधारली आहे.
नऊ महिन्यांच्या बाळाला आईचे यकृत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 3:06 AM