मीरा रोड : भार्इंदर स्थानकातून सुटणारी सकाळची ९ वाजून सहा मिनिटांची भार्इंदर - चर्चगेट महिला विशेष लोकल बंद करून ती विरार स्थानकामधून सोडायला सुरूवात केल्याने संतप्त महिला प्रवाशांनी आपला आंदोलनाचा पवित्रा शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही कायम ठेवला. सकाळी महिलांनी मीरा रोड रेल्वे स्थानकात आंदोलन करत १३ मिनिटे लोकल रोखून धरली.एक नोव्हेंबरपासून भार्इंदर स्थानकातून सुटणारी महिला लोकल बंद करण्यात आली आहे. तीच लोकल आता विरार स्थानकातून सोडली जात आहे. सकाळी गर्दीच्यावेळी भार्इंदरहून सुटणाºया महिला विशेष लोकलमध्ये चढायला तसेच बसायलाही मिळायचे. पण विरारवरून लोकल सोडल्याने भार्इंदरच्या महिला प्रवाशांना बसायलाच नव्हे तर आतमध्ये उभे राहयला जागाही नसते. मीरा रोडच्या प्रवाशांना जास्तच त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.गुरूवारी भार्इंदर रेल्वे स्थानकात महिला लोकल विरारहून आली असता भार्इंदर स्थानकात साखळी ओढून ती थांबवण्यात आली. तसेच महिलांनी रूळावर ठिय्या मारला होता. तर शुक्रवारी मीरा रोड रेल्वे स्थानकात महिलांनी लोकलसमोर रूळावर उतरत आंदोलन केले. १३ मिनिटे लोकल महिलांनी रोखून धरली होती. महिलांनी स्टेशन मास्तरांकडे भार्इंदरहून महिला विशेष लोकल पुन्हा सुरु करण्याची लेखी मागणी केली आहे. दरम्यान, गुरूवारचा प्रकार पाहता रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त होता.
महिला लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:53 PM