वसई : ‘मी वसईकर अभियाना’तर्फे गेल्या २५ दिवसांपासून वसईत अप्पर पोलीस अधीक्षक, वसई आणि वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आश्चर्य म्हणजे या ११ कोटींच्या कथित दफनभूमीच्या बांधकामात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपव्यय प्रकरणी शासन म्हणून पालघर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त असो वा पालघर पोलीस अधीक्षक कुणीही गंभीर नाही.या आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती घेत या गंभीर प्रकरणांची दखल घेऊन वसई - विरार महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात त्वरित गुन्हे दाखल करा, अशी मागणी पालघरचे खा. राजेंद्र गावित यांनी शनिवारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग व पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.दरम्यान, खा. गावित यांनी ‘मी वसईकर अभियान’चे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांची वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या धरणे आंदोलनस्थळी जाऊन शनिवारी भेट घेतली.या आंदोलनाबाबत माहिती जाणून घेतल्यावर खा. गावित यांनी वसई तहसीलदार किरण सुरवसे यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच आंदोलनकर्त्यांना पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत यांनी चांगलीच कान उघडणी करून तंबी दिली.या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला संबंधित पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग, वसई तहसीलदार, महापालिका आयुक्त, माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे आदींना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
‘मी वसईकर अभियान’ बेमुदत धरणे आंदोलकांना खा. गावितांनी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:27 AM