ठाणे : माजी उपमहापौर तथा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्याविरूद्ध पालिकेच्या तक्रारीवरून मंगळवारी राबोडी पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पाटणकर यांनी शेजारीशेजारी असलेले दोन ब्लॉक बेकायदा एकत्र केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली.पाटणकर यांचे राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य आहे. घरात केलेल्या बेकायदा फेरबदलाबाबत पालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली.आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर पाटणकर यांनी सातत्याने टीका केली होती. त्यामुळे दोघांमधील वाद चांगलाच चिघळला होता. त्यातच आयुक्त बिल्डरधार्जिणे असल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी पक्षाचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे अलीकडेच पत्राद्वारे केला होता.या पार्श्वभूमीवर पाटणकर यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाचे प्रकरण उघड झाल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची संधी प्रशासनाला चालून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत खमंगपणे सुरु आहे.
भाजपा गटनेत्यावर एमआरटीपीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:06 AM