वाडा : या तालुक्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरु असून वीज जोडणी नसतानाही बिल देण्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे. या शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वरले या गावातील बारकू बेंडू मढवी या नागरिकाकडे विद्युत जोडणी नसतानाही बिल देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराचा फटका गोरगरीब आदिवासी नागरिकांना बसत असून जागेवर पाहणी करून बील रद्द करावे, अशी मागणी मढवी यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे.महावितरण कंपनीचा सध्या भोंगळ कारभार सुरु असून त्याचा फटका आदिवासींना फटका बसत आहे. तालुक्यात काही ठिकाणी वीज खांब उभे केलेत तर वाहिन्या खेचायचा पत्ताच नाही. तर काही ठिकाणी नादुरुस्त खांब पडण्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त विद्युत जनित्र महिनोंमहिने बंद अवस्थेत असल्याने विजेअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. वरले येथील बारकू मढवी या नागरिकाला वीज मीटर देण्यात आले असून त्याचा नंबर ०१०५४७०५५१२१ असा आहे.फेब्रुवारी महिन्यात मीटर बसवण्यात आले आहे. मात्र विजेचा अद्याप पत्ताच नाही. विजेचे खांब उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात आलेत मात्र खांब उभारलेले नाहीत. त्यामुळे विजेचा येथे अद्याप पत्ताच नाही. असे असतानाही फेब्रुवारी महिन्यापासून दरमहा वीज बिल देण्याचा प्रताप महावितरण कंपनी करीत आहे. दरम्यान, माझ्या घराची पाहणी करून फेब्रुवारी महिन्यापासून आलेले विज बील रद्द करावे, अशी मागणी बारकू मढवी यांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
जोडणी नसतानाही महावितरणने दिले वीजबील; वरले गावातील चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:50 PM