पालघर : जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.पावसामुळे मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वसईच्या किनारा हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम दृतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला. जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणूत अनेक गावांचा संपर्क तुटला. तारापूरसह परिसरात संततधार कायम आहे. डहाणूत अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. तलासरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती आहे.वसई, विरार, नालासोपारा शहरातील सखल भागात पाणी साचले. पूर्वेतील तानसा नदीवरील पांधरतारा, मेढे, शिरवली हे तीन पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, जांबुलपाडा, थाल्याचा पाडा, आडणे, भिनार, मेढे, अंबोडे, वडघर, कळभोण आदी गावांसह अनेक आदिवासी पाड्यांचा शहराशी संपर्क तुटला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुरपाडा येथे पाणी आल्याने या मार्गाला नदीचे स्वरूप आले.वसई पूर्वेच्या सातिवली गावात रविवारी रात्री संरक्षक भिंत कोसळून शेजारच्या चार घरांची पडझड झाली. यात तीन पुरु ष व एक महिला असे जखमी झाली. नूरजहाँ अन्वर शेख, दीपक काठायत, वसंतलाल खैरनार, आणि हाथ गुलामभाई अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर उपचार झाल्यावर या सर्व कुटुंबाना सातिवली आद्योगिक वसाहतीतील काही गाळ्यांमध्ये हलविण्यात आले आहे.पुरात वाहून मृत्यूपारोळ : विरार येथील स्कूल व्हॅनचे चालक प्रकाश बाळू पाटील (४४) यांना पुराच्या पाण्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना वाचविताना जीव गमवावा लागला. सोमवारी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवताना विरार नारिंगी भागामध्ये पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची व्हॅन कलंडली. त्यात दोन विद्यार्थी पडल्याने त्यांना वाचविताना पाटील वाहून गेले.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 6:07 AM