आशीष राणे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार महापालिकेच्या ‘एच’ प्रभाग समितींतर्गत चुळणे परिसरातील एका विकासकाने टोलेजंग इमारती बांधून आरक्षण पडलेली जागा मनपाला बक्षीसपत्राने दिली. मात्र, याच ईएसआर आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठले नसतानाही तेथील मनपाचा फलक गायब झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. हा फलक त्या जागेवर पुन्हा कधी लागणार आहे, असा सवाल केला जात आहे.पाण्याच्या टाकीसाठी आरक्षित असलेला हा भूखंड बांधकाम व्यावसायिकाने बक्षीसपत्राने हस्तांतरित केला. मात्र, प्रत्यक्षात तो आजही महापालिकेला हस्तांतरित केलेला नाही, असे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या जागेवर दोन ते तीन वर्षांपूर्वी वसई-विरार शहर महापालिकेची मालकी दर्शविणारा नामफलक अस्तिवात होता. मात्र, कोविड काळात हा फलकच येथून गायब झाला आहे. महापालिकेने याची तक्रार पोलिसात केलेली नाही. याबाबतची तक्रार सुयोग नगरातील नागरिकांनी नगररचना व ‘एच’ प्रभाग समितीच्या तत्कालीन व सध्याच्या सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांच्याकडे केली असता, त्यांनी याबाबत आरक्षित भूखंड असलेल्या नवघर विभागातील सहाय्यक आयुक्त गिलसन घाेन्साल्वीस यांच्याशी बाेलण्याचा सल्ला दिला. तर अतिक्रमण विभागाचे अभय चौकेकर व बांधकाम उपअभियंता (ठेका) विवेक चौधरी हे सहाय्यक आयुक्त शिंदे यांना सांगा, असे सांगत आहेत. या प्रकारामुळे पालिकेच्या नगररचना व प्रभाग समितीच्या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त हाेत आहे.आयुक्तांनी आरक्षित भूखंडांची चौकशी करावीशहरातील आरक्षित जमिनी व भूखंड अथवा ३७ (१)ची कुठली प्रकरणे आजपर्यंत प्रलंबित आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तर या प्रश्नी आजपर्यंत प्रशासकीय कुठलीही माहिती वा त्यावर ठोस कारवाई केलेली दिसून आलेली नाही.
आरक्षित भूखंडावरील महापालिकेचा फलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:50 PM