वसई : पावसाळा तोंडावर आला असून पावसाळा पूर्व तयारीचे नियोजन, आव्हाने व त्यावरील उपाय-योजना बाबतची एक महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दि.३१ मे रोजी वसई विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक विरार मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी महापालिका आयुक्त व महापौर यांनी शहरातील व पालिका हद्दीतील सर्व विभागांच्या अधिकारी वर्गासमवेत मॅरेथॉन चर्चा केली. यावेळी महापौरांच्या समवेत महापालिका आयुक्त वसई विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक विजकांत सागर, माजी महापौर नारायण मानकर, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, अति.आयुक्त रमेश मनाले, उपायुक्त डॉ.किशोर गवस, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आदी हजर होते.
गतवर्षी अतिवृष्टीत झालेली पूरपरिस्थितीमुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले होते, यावर खबरदारी म्हणून झालेल्या बैठकीत सर्व पूर्वतयारीचा आढावा महापौर रुपेश जाधव यांनी घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने कार्यकारी अभियंता लाड यांनी नालेसफाई व गटार सफाईही सुमारे ९५ टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले तर उर्वरीत सफाई येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्र .८ वर पावसाळ्यात डोंगरावरुन येणारे पाणी रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर खोदाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला मोजक्याच सरकारी व निमसरकारी विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित राहिले, तर काही निवडक दुय्यम दर्जाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहिल्याने रुपेश जाधव व पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी स्पष्ट केले की आढावा बैठकीला गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांची ही बाब गंभीर असून त्या-त्या संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सभेचे वृत्त कळविण्यात येईले. वसई तालुक्यात सर्व प्राधिकरण काम करित असल्याने उद्भवणाºया आपत्तीवर सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज लक्षात घेऊन सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
पश्चिम रेल्वे सोबत बैठकीचे आयोजननायगावपासून ते विरारपर्यंत रेल्वेच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु असून पावसाळी पाणी या भिंतीला अडकून पाण्याचा निचरा होणार नाही व त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पूरपरिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरिता महापालिका व पश्चिम रेल्वे प्राधिकरण यांची तत्काळ एक संयुक्त बैठक होणे आवश्यक असून यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना माजी सभापती पंकज ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.