- आशीष राणे वसई : वसई-विरार शहर महापालिकेतील दांडीबहाद्दर, कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळी-अवेळी गैरहजेरीला आळा घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या सर्वच कार्यालयांमध्ये आता चेहरा पाहून हजेरीची नोंद करण्याची डिजिटल प्रणाली लागू केली जाणार आहे.वसई- विरार महापालिकेत १ हजार ५० कायम कर्मचारी असून साधारणपणे ६ हजार ठेका कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची पूर्वी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जात होती. मात्र, बायोमॅट्रिक यंत्रातील बिघाडामुळे योग्यरीत्या हजेरी नोंदवता येत नव्हती. दरम्यान, महापालिकेच्या सर्वच कार्यालयात मनमौजी, उशिरा येणारे तसेच वारंवार दांडी मारणे, सह्या करून गायब होणारे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘फेस आयडी’ दर्शविणारे एक विशेष अॅप तयार करण्यात येत आहे. यामुळे दांडीबहाद्दरांना चांगलीच चपराक बसणार आहे.कोरोनाच्या काळामध्ये मागील वर्षभरापासून बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी बंदच होती. त्यामुळे कर्मचारी खोटी हजेरी नोंदवत होते, तसेच कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा परिणाम प्रशासकीय व दैनंदिन कामवार होऊ लागला होता. महापालिकेतील अशा दांडीबहाद्दर-कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे पालिकेच्या मुख्यालयासह सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी फेस आयडीमार्फत लावली जाणार आहे. यासाठी एक विशेष अॅप तयार केले जाणार असून ते सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे.याबाबत माहिती देताना उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले की, हे अॅप अंतिम टप्प्यात असून यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती (डेटा) गोळा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे कुणालाही कामात कुचराई करता येणार नाही, तसेच वेळेवर कामाच्या ठिकाणी हजरही राहता येईल. पालिकेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांना ‘फेस आयडी’द्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. तीन वेळा उशीर केला तर एका गैरहजेरीची नोंद! महानगरपालिकेत कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम बनवले आहेत. कर्मचाऱ्यांची हजेरीची वेळ सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे आहे. तीन वेळा उशिरा आल्यास त्याची कामावर एक गैरहजेरी नोंदवली जाईल. आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या फेस आयडीद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आल्याने दांडीबहाद्दर व उशिरा येणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे.
वसई-विरारच्या दांडीबहाद्दर-कामचुकारांना महापालिका आयुक्त देणार डिजिटल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:45 AM