लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्व येथील आरक्षणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ४३ पैकी पात्र ३३ झोपडीधारकांना पालिकेने सदनिका देऊन पुनर्वसन केल्या नंतर शनिवारी येथील अनधिकृत बांधकामे पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आली . अतिक्रमण हटल्याने सांस्कृतिक कलादालनाचा मार्ग मोकळा झाला आहे .
भाईंदर पूर्वेला आझाद नगर भागात पालिकेचे सामाजिक वनीकरण व खेळाचे मैदान चे आरक्षण आहे . सदर आरक्षणा पैकी खेळाच्या मैदानात १५ टक्के इतके दिवंगत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कलादालनाचे बांधकाम करण्यास महासभेच्या ठरावा नंतर शासनाने मंजुरी दिली होती .
पालिकेतील सत्ताधारी भाजपाने मात्र बाळासाहेबांच्या कलादालनास सातत्याने खोडा घालण्याचा प्रयत्न केला . त्यावरून पालिकेत तोडफोडीचा प्रकार घडला होता . खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईकयांच्या पाठपुराव्या मुळे महाविकास आघाडी शासनाने ह्या कामासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर केला . त्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई भूमिपूजन गेल्या वर्षी करण्यात आले होते .
परंतु सदर आरक्षणाची जागा पालिकेने टीडीआर देऊन ताब्यात घेतली असली तरी त्यावर ४३ अनधिकृत बांधकामे झाली होती . ह्या प्रकरणी न्यायालयात दावा सुरु होता . स्थानिक शिवसेना पांडे व सेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करा म्हणून सतत पालिके कडे पाठपुरावा करत होते .
पालिकेच्या म्हणण्या नुसार, न्यायालयाकडून अतिक्रमण करणाऱ्या झोपडीधारकांना स्थगिती मिळाली नाही. न्यायालयात आवश्यक ती सर्व कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सादर करुन महानगरपालिके मार्फत एड. संगिता फड यांनी बाजू मांडली होती . झोपडीधारकांची महानगरपालिकेने सुनावणी घेऊन पात्र ३३ झोपडीधारकांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून भाडे तत्वावरील घरे या योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या पेणकरपाडा येथील एस.के.हाईटस इमारतीतील सदनिका गुरुवारी हस्तांतरित केल्या .
पात्र झोपडीधारकांना सदनिका दिल्या नंतर आयुक्त.दिलीप ढोले यांनी सर्व अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश उपायुक्त अजित मुठे यांना दिले. त्यानुसार शनिवारी मुठे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, उप अभियंता नितीन मुकणे, अतिक्रमणचे विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पालिकेच्या - अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जेसीबीने तोडक कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत भोसले, नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मिलिंद देसाई मोठा पोलीस बंदोबस्त होता . अग्निशमन दलाची वाहने व परिवहन सेवेच्या बस , रुग्णवाहिका तैनात होत्या .