नालासोपारा : वसई- विरार परिसरात होत असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची तयारी वसई- विरार महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या जी प्रभागातील हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर शुक्रवारी कारवाई केली. एकूणच या मोठ्या कारवाईमुळे काही दिवसांपासून थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाली आहे.
आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले आणि संजय हेरवाडे, उपायुक्त डॉ.किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत प्रभाग जी चे सहायक आयुक्त प्रशांत चौधरी, अतिक्र मण अधिकारी विजय नगडे व इतर या प्रभागातील कर्मचारी हजर होते.या कारवाई दरम्यान वालीव भूतपाडा येथील ८ हजार ५०० चौ. फुटाचे ९ गाळ्यांचे बांधकाम तोडले. वालिव धुमाळ नगरमधील नाल्याजवळ असलेल्या ४ हजार चौरस फुटाचे पत्र्याचे शेड बांधलेले ४ गाळे पाडले. गोखिवरे, भोयदापाडा परिसरातील १ हजार ८०० चौ.फूट बांधलेले पत्र्याचे शेड, गाळ्यांचे बांधकाम तोडण्यात आले आहे. या कारवाईत एकूण १४ हजार ३०० चौ. फुटाचे बांधकाम तोडण्यात आले.