राजेश भांगे लोकमत न्यूज नेटवर्कटाेकावडे : मुरबाड नगरपंचायतीचा कालावधी येत्या २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असताना निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून सर्व पक्षांंत उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या भाजपच्या विद्यमान नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
ज्या ठिकाणी पुरुष उमेदवार होते, तेथे महिला आरक्षण पडल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांना आता महिलाराजला सामोरे जावे लागणार आहे. नव्या आरक्षणानुसार प्रभाग क्र. ३, ८, १०, ११, १२ व १४ सर्वसाधारण , प्रभाग क्र. १, ५, १३ व १७ यात सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. २, ६, ९ या प्रभागांत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर प्रभाग क्र. ७ व १३ मध्ये ना.मा.प्र सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ अनुसूचित जाती महिला राखीव, तर प्रभाग क्र. १६ अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण पडले आहे.
या आरक्षणामुळे विद्यमान भाजप नगरसेवक विकास वारघडे, नितीन तेलवणे, किसन अनंत कथोरे, वैभव भोसले, मोहन सासे, छाया चौधरी, नारायण धुमाळ तसेच काँग्रेसचे एकमेव नगरसेवक रवींद्र देसले यांच्या राजकीय कारकिर्दीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भाजपची सर्व सूत्रे आमदार किसन कथोरे यांच्या हातात असून त्यांच्या प्रयत्नामुळे मुरबाड नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेसची मदार सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यावर आहे.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेले ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यामुळे शिवसेना एक आव्हान निर्माण करू शकते, तर भाजपचे माजी ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने निवडणूककाळात काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. तर, मनसेही निवडणूक रिंगणात असणार आहे.
नगरपंचायतीवर येणार महिलाराजमुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली, तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महिला उमेदवारांची संख्या मोठी असल्याने आगामी काळात मुरबाड नगरपंचायतीवर महिलाराज येणार, हे नक्की आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक उमेदवारीसाठी घरातील महिलांना पुढे करणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे.