मीरारोड: साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करून पळालेल्या आरोपीला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. भाईंदर पूर्व भागात १० जानेवारी रोजी मोहम्मद मुबारक अली हा इसम मद्यपान केलेल्या व डोक्याला जखम झालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात दाखल केले होते . उपचारा दरम्यान त्याचा १४ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
नवघर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास चालवला होता. तपासात मोहम्मद मुबारक अली व त्याचा सहकारी करीमउल्ला खान यांच्यात भांडण झाले होते. साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या या भांडणात खान याने अली यास मारहाण केली होती . व त्यात मारहाणीत अली हा जखमी होऊन नंतर मरण पावला असल्याचे उघडकीस आले.
दरम्यान अली ह्याला मारहाण करून खान हा पसार झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कांबळे सह पोलीस पथक हे आरोपीचा शोध घेत होते. तर आरोपी करीमउल्ला खान हा पश्चिम बंगाल मधील सुलतानगंज, अलीपुर तसेच दिल्लीच्या नोएडा भागात सतत आपले वास्तव्य बदलून रहात होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत खान याला सुलतानगंज भागातून अटक केली आहे .