मंगेश कराळे
नालासोपारा : गेल्या आठवड्यात नायगाव येथे एका बॅगेत शाळकरी मुलीच्या मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर मुलीची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून निर्जन स्थळी टाकण्यात आला होता. या घटनेनंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात वालीव पोलिसांना यश आले होते. या १४ वर्षीय मुलीची हत्या तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे स्पष्ट झाले होते. हे दोन्ही आरोपी सदर घटनेनंतर फरार झाले होते. मात्र वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या फरार दोन्ही आरोपींना गुजरात राज्यातील पालनपूर येथून शूक्रवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीत या दोघांनी सदर मुलीची हत्या का केली याचा उलगडा होणार आहे. संतोष मकवाना व विशाल अनभवा अशी या दोन आरोपींची नावे आहेत.
२६ ऑगस्ट रोजी नायगाव परिसरातील उड्डाणपूलाच्या खाली असेलल्या झुडपात एका बॅगेत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पोटावर चाकूने १२ ते १५ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. बॅगेजवळच पोलिसांना एका शाळेचा बॅच सापडला होता. त्यावरून तिची ओळख पटविण्यात आली. ही मुलगी ९ वीत शिकत होती. ती सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती, तेव्हापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जुहू येथे हत्या करून ट्रेनमधून तिचा मृतदेह आरोपींनी बॕगेमध्ये भरुन आणला होता. वालीव पोलिसांनी या हत्येचा त्यानंतर अवघ्या काही तासांतच छडा लावला होता. या मुलीची हत्या तिच्या २१ वर्षीय प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी तिच्या प्रियकारने या मुलीला त्याच्या मित्राच्या जुहू येथील घरी आणले. त्या मित्राचे आई वडील कामाला गेले होते. घरात दोघांनी मिळून मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील ट्रॅव्हल बॅगेत भरला. या बॅगेत घरातून कपडे घेऊन मृतदेह झाकला होता.
या दोघांनी मृतदेह बॅगेत भरल्यानंतर ती बॅग घेऊन विरार लोकलने नायगाव येथे आणून टाकला होता. त्याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले होते. हे दोन्ही आरोपी विरार येथून गुजरातला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले होते. अखेर वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील पालनपूर येथून त्या दोघांना अटक केली आहे.
सदर हत्येच्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून पकडले आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी वसई न्यायालयात हजर केले असून १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.
कैलाश बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे)