पालघर : मनोर येथील एका तरूणाचा काटा काढण्याच्या कटात सहभागी होण्यास पालघरमधील एका मुलाने नकार दिल्याने सत्तर गाळ्याजवळील करण बुटीया नामक युवकाने रविवारी (४ आॅक्टो.) त्याला एका निर्जन स्थळी नेऊन त्याचा गळा दाबून तसेच चाकूने जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर-माहिम रस्त्यावरील सत्तर गाळ्याजवळ संतौष जैस्वाल हा कारागिर पत्नी, मुलगी व दोन मुलांसह पंधरा वर्षापासून राहतो. रविवारी संध्याकाळी ५.३० वा. च्या सुमारास जैस्वाल यांच्या आठवीतील मुलाला आरोपी करण याने कामाच्या बहाण्याने सत्तर गाळ्यामागील एका निर्जन वाडीमध्ये नेले. मनोर येथील एका तरूणाचा काटा (ठार) काढायचा असून त्या कामात तु मला मदत कर असे गळ्यावर चाकू ठेवून बजावले. मात्र, त्याने या कामास नकार दिल्याने आरोपीने त्याचे हात बांधून त्यांच्या अंगावर हातातील चाकू टोचून त्याला जोरदार मारहाण करायला सुरूवात केली. अशी गुन्हेगारी कामे मी करीत नाही असे तो पुन्हा पुन्हा सांगत असतानाही आरोपीने त्याचे तोंड बंद करून सतत मारहाण केल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले. अनेक वेळा सांगूनही तो होकार देत नसल्याने तसेच त्याला सोडल्यानंतर तो बाहेर याची वाच्यता करेल म्हणून आरोपीने त्याचा गळा दाबला. तो मुलगा बेशुद्ध पडला. त्या मुलाचा मृत्यू झाल्याचा समज झाल्याने करण याने संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. परंतु तासाभरात अल्पवयीन मुलाला शुद्ध आल्याने त्याने गवताने पुर्णत: वेढलेल्या निर्जन स्थळावरून आपले घर गाठले. मुलाची अवस्था पाहिल्यानंतर त्याची आई इंदू जैस्वाल यांनी त्याची विचारपूस करून सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठले. पोलीसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवून आरोपी करण बुटीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी बुटीया याची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे इंदू जैस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले. घटनास्थळी दोन दिवसापासून अल्पवयीन मुलाचे कपडे, सँडल व आरोपीने वापरलेला चाकू पडून होता. या घटनेमुळे आपल्या मुलावर पुन्हा खुनी हल्ला केला जाईल या भीतीने पूर्ण जैस्वाल कुटुंब प्रचंड दबावाखाली वावरत असून पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. यासंदर्भात तपास अधिकारी पारधी यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खूनाच्या कटात सहभागास नकार देणाऱ्यावर खुनी हल्ला
By admin | Published: October 06, 2015 11:17 PM