वसंत भोईर / वाडातालुक्यातील तोरणे गावातील दोन मुस्लिम बंंधूंनी वडिलोपार्जित वास्तू असलेली जागा मंदिरकरिता दान करून नवा आदर्श घालून दिला आहे. हे मंदिर हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बनले आहे. जेमतेम वीस घरांची लोकवस्ती असलेलं हे गाव. सोबतीला आदिवासी लोकवस्ती असलेले काही पाडे. या गावात मंदिर बांधवे , असा संकल्प गावकऱ्यांनी केला. मात्र त्यासाठी जागा कोण देईल असा प्रश्न गावकऱ्यांपुढे होता. त्याचवेळी या गावात पिढ्यानिपढ्यापासून राहणारे रफिक व शफिक सलीम चौधरी हे बंधू गावकऱ्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी आपल्या पूर्वापार राहत्या घराचीच जागा मंदिराच्या बांधकामासाठी दान देवून बंधूभाव जोपासला आहे. चौधरी यांचे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावात राहत होते. रफिक व शफिक यांचे दिवंगत बंधू हनिफ चौधरी हे कर्ते झाल्यानंतरहे कुटूंब गेल्या काही वर्षांपूर्वी तालुक्याच्या ठिकाणी रहावयास गेले. मात्र, गावाशी असलेली आपली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. हेच त्यांनी मंदिराला दान दिलेल्या जागेवरून सिध्द होत आहे. त्यांच्या या कृतीने हिंदू - मुस्लिम एकतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी दान दिलेल्या जागेवर आता भव्य मंदिर उभे राहिले आहे. या मंदिरातील श्री गणेश, विठ्ठल रखुमाई व हनुमानाच्या मूर्तींचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान झाला. त्यात चौधरी कुटुंबांने सहभागी होऊन इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे.
मंदिरासाठी दिली मुस्लिमांनी जागा
By admin | Published: February 18, 2017 6:27 AM