Bhayandar Father-son Death : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ जुलै महिन्यात पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. ८ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी घेतल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता. सुरुवातीला शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने दोघांनी आयुष्य संपवले असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र कुटुंबियांनी हा दावा फेटाळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली. तपासानंतर आता या प्रकरणाचे गूढ उकललं आहे.
हरिष मेहता (६०) आणि जय मेहता (३०) हे ८ जुलै रोजी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. फलाट क्रमांक सहावरून खाली उतरून ते मीरा रोडच्या दिशेने रेल्वे रुळांवरून चालत गेले. त्यानंतर काही अंतरावरच लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होतं होतं. हा सगळा प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. मात्र दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण पुढं आलं नव्हतं. महिन्याभरानंतर आता वसईतील मेहता पिता पुत्रांच्या या आत्महत्येचे गूढ अखेर उकलले आहे.
हरिष मेहता हे नैराश्याने ग्रस्त होते. तर जय मेहता याने अन्य धर्मीय मुलीशी लग्न केले होते. आंतरधर्मीय विवाहामुळे जय मेहता त्रस्त झाला होता आणि त्याची पहिली पत्नी त्याला बदनाम करण्याची धमकी देत होती. या कारणांमुळेच दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटलं आहे. जय मेहताचा मोबाईल फोन, त्याच्या कार्यालयात सापडलेली डायरी तसेच त्याची पहिली पत्नी आणि दुसर्या पत्नीच्या जबानीतून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
जय मेहता याचे एका मुस्लिम तरुणीशी गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी प्रतित्रापत्राद्वारे लग्नही केले होते. मात्र आपला समाज मुस्लिम तरुणीला स्वीकारणार नाही म्हणून जयने तिला अंधारात ठेवून एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला होता. जयच्या पहिल्या पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने याबाबत जाब विचारला आणि दुसऱ्या पत्नीला सोड असा दबाव टाकायला सुरुवात केली. इकडे, दुसर्या पत्नीलाही जयच्या पहिल्या लग्नाबाबत समजल्याने त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे हे प्रकरण लोकांना समजल्यास आपली बदनामी होईल अशी भीती मेहता पिता पुत्रांना वाटत होती. त्यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वेखाली उडी घेतली, अशी माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली.
दरम्यान, रेल्वे पोलिसांना तपासात जय मेहताच्या मरोळ येथील ऑफिसमध्ये एक डायरी सापडली होती. या डायरीमध्ये त्याने दोन्ही पत्नींना उद्देशून एक माफीचे पत्र लिहीले होते. जयने पत्रातून दोन्ही पत्नीची माफी मागितली होती. पोलिसांना जयच्या मोबाईल मधील सीडीआर आणि डायरीतून आणखी माहिती देखील मिळाली.