- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पश्चिमेकडील गावांना हायवे आणि नायगाव पूर्वेकडील गावांना पश्चिमेला जोडणारा महत्वाचा नायगाव रेल्वे उड्डाणपूल रखडला आहे. एक वर्षांची मुदतवाढ येत्या ३० तारखेला संपुष्टात येत आहे तरी काम अद्यापही अर्धवट आहे. दुसरीकडे, पूलाच्या गर्डरला दोनवेळा तडे गेल्याने दर्जाबाबतही साशंकता व्यक्त करण्यात येते.वसई तालुक्यातील महत्वाची सर्वच कार्यालये कोर्ट, पंचायत समिती, तहसिल कचेरी, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, आरटीओ केंद्र वसई गावात अर्थात नायगावच्या पश्चिम भागात आहेत. मात्र, नायगाव ला रेल्वे उ्ड्डाणपूल नसल्याने नायगाव पश्चिमेकडील अनेक लहान मोठ्या गावातील गावकऱ्यांना सरकारी कामाकाजासाठी वसई रेल्वे उड्डाणपूलावरुन ये-जा करावी लागते. दुसरीकडे, नायगाव पश्चिमेकडे असलेल्या सर्वच गावातील गावकऱ्यांना ठाणे, मुंबई आणि त्यापलिकडे ये-जा करायची असेल तर ती वसई रेल्वे स्टेशनवरील उड्डाणपूलावरून करावी लागते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. यावर उपाय म्हणून नायगाव रेल्वे उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल झाल्या नंतर नायगाव पश्चिमेकडील गावकऱ्यांना अवघ्या काही मिनिटातच मुंबई-अहमदाबाद हायवेवर पोहोचता येणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाण्यासह इतर ठिकाणी सहजपणे प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर नायगाव पूर्वेकडील गावकऱ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये अवघ्या दहा-पंधरा मिनिटात विनासायास ये-जा करता येणार आहे. प्रारंभी तिवरांची झाडे आणि मिठागरांची जमीन यामुळे पूल अ़नेक वर्ष रखडून पडला होता. शेवटी एमएमआरडीएने पुढाकार घेऊन नायगाव-जुचंद्र-बापाणे रस्ता उड्डाणपूलासह मंजूर केला. उड्डाणपूलासह ५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एमएमआरडीएने १०८ कोटी ५ लाख रुपये खर्चाचे काम २० डिसेंबर २०१३ रोजी सिम्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर ला दिले आहे. हे काम करण्यासाठी अंतिम मुदत ३० जून २०१६ होती. मात्र, पूलाचे काम रखडल्याने ३० जून २०१७ पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्येही हे काम होणार नाही हे आता स्पष्ट झाल्याने ते होणार तरी कधी असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. दोनदा गर्डर बदलले दर्जाबद्दल संशयमुदतवाढ संपायला आता अवघे काही दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र, उड्डाणपूलाचे निम्म्याहून अधिक काम अद्याप अपूर्ण आहे. पूलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान एक वर्ष लागणार असल्याची माहिती जाणकार देत आहेत. त्यातच गेल्या सहा महिन्यात पूलाच्या गर्डरला दोन वेळा तडे गेले होते. दोन्ही वेळा गर्डर बदलण्यात आले. त्यामुळे आता पूलाच्या कामाच्या दर्जाविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
नायगाव उड्डाणपूल रखडला
By admin | Published: June 11, 2017 2:49 AM