लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसन गोळीबारात झाले. आरोपीने केलेल्या तीन राऊंड फायरिंगमध्ये पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर वाकीपाड्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वसईत जमिनीच्या वादातून आतापर्यंत अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले जात आहे.
नायगाव वाकीपाड्यात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटात भिषण राडा झाला. बापाणेतील जमिनीवरुन मेघराज भोईर यांचा हाऊसिंग एल.एल.पी.ग्रुप सोबत वाद होता. मंगळवारीही मेघराज भोईर व सामनेवाले यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळीही मेघराज भोईर यांनी बंदुक काढली होती. या प्रकरणीही नायगाव पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी दुपारी जमिनीच्या पंचनाम्यासाठी महसुल अधिकारी-कर्मचारी आले होते.
पंचनाम्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास मेघराज भोईर व सामनेवाला यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटात भिडत झाल्यानंतर मेघराज भोईर यांनी शिकारीच्या बंदुकीतून तीन राऊंड फायर केल्या. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले तर अन्य तीन किरकोळ जखमी झाले. या हाणामारीत गाड्याही फोडल्या आहेत. गोळीबारात जखमी झालेल्यांच्या खांद्यात, मांडीत व हातात गोळी लागली आहे.
संजय जोशी, अनिश सिंग, शुभम दुबे, विरेंद्र चौबे, वैकुंठ पांडे, संजय राठोड व राजन सिंग अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणात मेघराज भोईरसह पाच आरोपींना नायगाव पोलिसांनी अटक केले असून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनीही भेट दिली.