वसई : उत्तर प्रदेशमधील हाथरसची घटना ताजी असताना नालासोपारा येथे पोलिसांच्या चुकीच्या आणि हेतुपुरस्सर वागणुकीमुळे तसेच परिसरातील टवाळखोरांच्या मानसिक छळामुळे १९ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवले असल्याचे उघड होत आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.प्रियकराने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तिला न्याय मिळाला नाही, उलट तिलाच दोषी धरण्यात येऊन अपमानजनक वागणूक देण्यात आली. त्याच वेळी परिसरातील टवाळखोर तरुणांनाही याची माहिती मिळाल्याने तेही तिची टवाळी करीत असल्याने तिची मानसिक कोंडी झाली. यातूनच शुक्रवारी त्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही, उलट अपमानजनक वागणूक दिली, त्यामुळे त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. ही तरुणी राहत असलेल्या परिसरातील काही टवाळखोर तरुणांकडून आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या तुळिंज पोलिसांकडूनच तिचा मानसिक छळ झाल्याने या तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा गंभीर आरोप तरुणीच्या आई-वडील व कुटुंबीयांनी केला आहे. या तरुणीचे सुनील माने या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सुनीलविरोधात १५ सप्टेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.संबंधित तरुणीच्या तक्र ारीवरून पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या काही दिवस आधीच हे दोघेही फरार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तुळिंज पोलिसांनी या दोघांनाही शोधून मुलीला नातेवाइकांच्या स्वाधीन केले होते. तरुणीचे आणि सुनीलचे असलेले प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नव्हते. तरीही तिला सुनीलशीच लग्न करायचे होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे. माझ्या या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे या मुलीने या पत्रामध्ये लिहिले आहे. तरीही तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाची दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई
पोलीस-टवाळखोरांमुळे संपवले जीवन?; १९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:54 AM