- मंगेश कराळे नालासोपारा - घरफोडी, चोरी करणाऱ्या तीन आरोपींना वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल करून चोरलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
वालीव फाटा येथील धुरी इंडस्ट्रीज मधील जीएसएस इंजिनीयरींग प्रा लि कंपनीत २० ऑगस्टला संध्याकाळी चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी सनुप देवीदत्त तिवारी (२६), वाहीद माजीद शेख (१९) आणि धर्मेंद्र मोतीलाल यादव (२८) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे तपास केल्यावर वर नमुद गुन्हात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली. अटक आरोपीकडे गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी आरोपीकडे अधिक तपास केल्यावर वालीव पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील ६ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचेे दागिने, केबल वायर, इतर माल व रोख रक्कम असा एकुण २ लाख ८१ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.