- मंगेश कराळे नालासोपारा - ऍन्टीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी ३५ लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. रबाळे पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिल्यावर दोन तासांच्या आत आरोपीला अटक केले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
ऐरोली येथे राहणारे सेवानिवृत्त अधिकारी कांतीलाल यादव (६०) यांच्या घरी २१ जुलैला दुपारी ६ अनोळखी आरोपींनी ऍन्टीकरप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून घराची घरझडती घ्यावायाची आहे अशी बतावणी करत घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, २ मनगटी घडयाळे, व चामडयाची बॅग असा ३४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडा टाकला. तसेच त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास करून ११ आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील मोरक्या अमित वारिक हा ३ महिन्यापासून फरार होता व त्याचा पोलीस शोध घेत होते पण रबाळे पोलीसांना त्यामध्ये यश येत नव्हते.
रविवारी रबाळे पोलीसांनी आरोपी हा विरार येथे वास्तव्यास येणार असल्याबद्दल माहिती देऊन शोध घेण्यासाठी कळवले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी अमित वारिक याचे शोधार्थ रबाळे पोलीसांकडून माहिती संकलित करुन बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा मागोवा घेतला. त्या आधारे आरोपी अमित संजय वारिक (३५) याला चंदनसार येथील आर के हॉटेल जवळ ताब्यात घेतले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन, त्याचेवर खंडणी, फसवणुक यासारखे मुंबई, ठाणे, आयुक्तालयात अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.