वसई : नालासोपारा-ठाणे विना वाहक वाहतूक करण्याचा एसटीचा निर्णय फुकट्या प्रवाशांचा पथ्यावर पडला असून, तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांच्या त्रासात मात्र भर पडली आहे. तर दीड तासाचा प्रवास दोन तासाचा झाला आहे. नालासोपारा-ठाणे एसटी वाहतूक दर अर्ध्यातासाच्या अंतराने सुरु आहे. भरगच्च प्रवासी असलेल्या या फेऱ्यांमधून चांगला नफा होत असला तरी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याऐवजी त्रासच होत आहे. याकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष नाही. या मार्गावरील गाड्यांमध्ये असलेले वाहक हटवण्यात आले आहेत. नालासोपारा डेपोत ठाणे गाडी लागल्यावर आतील सर्व प्रवाशांची तिकीटे काढण्याचे काम वाहकाकडून केले जाते. त्यानंतर वाहकाला उतरवून विनावाहक फेरी सुरु होते.तुळींज, वर्तक टॉवर, संतोष भवन,बिलालपाडा अशा चार थांब्यावरील प्रवासी घेतल्यानंतर पेल्हार फाट्यावर एसटी थांबवण्यात येते. त्या ठिकाणी उभा असलेला वाहक बसमध्ये चढून उर्वरीत प्रवाशांची तिकीटे काढतो. त्यानंतर पुन्हा विना वाहक प्रवास सुरु होतो. वसई फाटा, बर्माशेल, तुंगारेश्वर, कामण फाटा अशा महामार्गावरील थांब्यावर प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर एसटी ठाण्याच्या मार्गाला लागते. या सर्व थांब्यादरम्यान वाहक नसल्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आपल्या इच्छित स्थळावरून विनातिकीट प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विनावाहक फेऱ्यांमधून एसटीचे नुकसान होऊ लागले आहे. पूर्वी नालासोपारा-ठाणे हा प्रवास दिड तासाचा होता. वाहक एसटीतच असल्यामुळे वेळ न दवडता गाड्या धावत होत्या. या धावत्या गाडीतच तिकीटे काढली जात होती. तिकीटे काढणारा वाहक गाडीतच शेवटपर्यंत असल्यामुळे कोणत्या प्रवाशाने तिकीट घेतले नाही. कोणत्या प्रवाशाने कुठले तिकीट घेतले. कोणाला कुठे उतरायचे आहे. याची त्याला माहिती असायची त्यामुळे प्रवासादरम्यानचा वेळही वाचत होता आणि फुकट्या प्रवाशांनाही चाप बसत होता. एखाद्या नवख्या प्रवाशाला इच्छितस्थळी उतरण्यासही मदत होत होती. (प्रतिनिधी)
नालासोपारा-ठाणे प्रवास २ तासांचा
By admin | Published: December 26, 2016 5:56 AM