लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांनी मात्र मेहतांच्या मेळाव्याशी भाजपाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपातील मतभेद वाढतच चालले आहेत.
नरेंद्र मेहता व समर्थकांनी जोरदार विरोध करून देखील भाजपा प्रदेश नेतृत्वाने मेहताना न जुमानता जिल्हाध्यक्ष पदी ऍड. रवी व्यास यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे व्यास यांनी आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास आले असता मेहता व समर्थकांनी पाटील यांच्या उपस्थिती कडे सपशेल पाठ फिरवली. प्रदेश नेतृत्वाने दिलेले प्रदेश सचिव पद सुद्धा मेहतांनी धुडकावून लावले. मेहता व समर्थक हे व्यास यांना जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे जिल्हा कार्यालय मानत नाहीत.
भाजपा प्रदेश नेतृत्वाला आव्हान देत असलेले मेहता हे शहर व महापालिकेत शक्ती प्रदर्शन करण्यात आता पर्यंत यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. आता मेहतांनी मीरा भाईंदर भाजपा कार्यकर्त्यांचा रविवारी सायंकाळी त्यांच्या शाळेच्या मैदानात जाहीर मेळावा आयोजित करून आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे.
मेहता हे शहरातील भाजपात स्वतःची पकड कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असुन मेळाव्यात स्वतःची ताकद दाखवून ते भाजपातील त्यांच्या स्थानिक विरोधकांसह प्रदेश नेतृत्वाला इशारा देण्याच्या आणखी एका प्रयत्नात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.