वसई: आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे. पण, गोडसे हा महात्मा कधीच होऊ शकत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी वसईत सुवार्ता साहित्य मेळाव्यात बोलताना केले.वसईतील देवतलाव येथील बर्नड भंडारी सभागृहात गांधी जयंतीला सुवार्ता साहित्य मेळावा पार पडला. यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, सत्याचे प्रवासी महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू मानत. मात्र, डॉ. दाभोेळकरांची हत्या करणारे सनातनी हिंदू गांधीजींच्या सनातनी हिंदू धर्मातील नाहीत, असा टोलाही सबनीस यांनी आपल्या भाषणात लगावला.महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. गांधींचा महात्मा पंचाधारी आहे. तो गरीबांची वेदना, समस्या जाणतो. मजूर, शेतकरी, शोषित, पीडित यांच्याशी जेव्हा तो संवाद साधतो, तेव्हा तो महात्मा असतो आणि तो जेव्हा इंग्रजांशी वाटाघाटी करीत असे तेव्हा त्याच्यातल बॅरीस्टर जागृत होत असे. त्यांच्या ठायी महात्मा व बॅरिस्टर यांचा सुंदर समन्वय दिसून येतो, असेही प्रा. सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो होते. धर्मा-धर्मातील संवाद, मैत्री यांची कास ख्रिस्तसभा धरते. ख्रिस्तसभा विश्वव्यापी आहे. आपण धर्माने ख्र्स्तिी असलो तरी आपली उपासना ही आपण मराठी भाषेत करीत असतो. आपण मराठी माणसे आहोत. मराठी आपली मातृभाषा आहे. ख्रिस्ती वसईकरांनी मराठी भाषेची जोपासना केलेली आहे. तिचे जतन केलेले आहे. पूर्वी ख्रिस्तसभेची भाषा लॅटीन होती. पण दुसºया व्हॅटिकन परिषदेनंतर जेथे जेथे ख्रिस्ती लोक आहेत, तेथे जी भाषा बोलतात ती त्यांची भाषा असेल, अशी परंपरा सुरु झाली, असे डॉ. मच्याडो यांनी आपल्या भाषणात सांगितले.मेळाव्यात फा. डॉ. रॉबर्ट डिसोजा यांच्या बायबलमधील संदेष्टे, फा. डॉ. एलायस रॉड्रीग्ज यांच्या पेरणी व बायबलचा मराठी अवतार, जॉन गोन्सालवीस यांच्या निवडक बोधकथा व फा. डॉ. नेल्सन फलकाव यांच्या सुबोध ख्रिस्तपुराण या पुस्तकांचे प्रकाशन आर्चबिशप मच्याडो यांच्या हस्ते करण्यात आले.दुसºया सत्रात ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बिवलकर यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरुप याविषयी आपले मत मांडले. डॉ. नितीन तांडेल यांनी सभोवतालचा निसर्ग हाच तुमचा धन्वंतरी याविषयी मत मांडले. दुपारच्या सत्रात ४२ वर्षे उद्धवस्त शरपंजरी अवस्थेत आयुष्य जगलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांच्या जीवनावरील काळीज हादरुन टाकणारा, अरुणा शानबाग यांची वेदना मांडणारी हद्यस्पर्शी एकपात्री प्रयोग मी अरुणा बोलतेय हे डॉ. प्रतिभा जाधव यांनी सादर केला.कविसंमेलनात जसिंटा डायस, सॅबी परेरा, जॉन गोन्सालवीस, जितेंद्र वर्तक, फ्रान्सिस कोळी, रोजिका जांगुल यांनी आपल्या कविता सादर केल्या. समारोपाच्या सत्रात डॉ. विनीत वानखेडे यांनी माझा सामना कॅन्सरच्या रोगाशी याविषयी मन हेलावून टाकणारे आत्मकथन केले.मेळाव्याच्या सुरुवात एस.व्ही.डी. नृत्य अॅकॅडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याने झाली.
‘नथुराम गोडसे महात्मा होऊच शकत नाही’, गांधी तत्वज्ञानावर भाष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:58 AM