डहाणू/बोर्डी : चंद्रनगर हे विज्ञान क्षेत्रातील नाव विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास प्रेरणादायी ठरते आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणारी ही जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे. तर ‘न पेटणारी झोपडी’ या प्रकल्पाच्या माध्यमातून जंगलात वणवा लागल्यावर झोपडीचे संरक्षण करणारा प्रकल्प विज्ञान प्रदर्शनातून मांडण्यात आला. तो राज्य तसेच राष्ट्रीयस्तरापर्यंत गाजला. या गावातील प्राथमिक शाळेची स्थापना १९७८ मध्ये झाली. आता नववीपर्यंतचे वर्ग असून ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या काळात सर्वाधिक पटसंख्येची शाळा असा लौकिक या शाळेने निर्माण केला.
याकरिता विविध शासकीय योजना आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यापैकी आठवडे बाजार, बालक मेळावा आणि विविध सण साजरे करताना ग्रामस्थांना सहभागी केल्याने अप्रत्यक्षपणे शाळा घराघरात पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा पट टिकविण्यात यश आले आहे.‘आमची शाळा’ उपक्रमाद्वारे गावातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केल्यावर इयत्ता पाचवी आणि आठवीनंतर विद्यार्थी गळतीचे प्रमाण जास्त दिसले. या विद्यार्थ्यांना पुन्हा सामावून घेण्यासाठी ‘शेतीशाळा’ हा निवासी उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांमधील बुरूड कामाची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रत्यक्ष कामाची संधी दिल्यावर त्यांनी अनेक वस्तू साकारल्या आहेत.उपयुक्त उपक्रमया तालुक्यात कवडास धरण बांधण्यात आले. तेथील विस्थापित आदिवासींना वाणगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सात किमी अंतरावर असलेल्या वणई गावात चंद्रनगर ही वसाहत निर्माण करून पुनर्वसन केले. येथे आदिवासींच्या कोकणा या जातीची वस्ती असून दहा ते बारा कुटुंबे मुस्लीम धर्मीयांची आहेत.लागोपाठ सुट्टी आल्यावर दुसºया दिवशी शाळेतली उपस्थिती खूपच कमी होते. याकरिता आठवडे बाजार हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. त्यामुळे बाजाराच्या आकर्षणाने गैरहजेरीचे प्रमाण थांबले. बाजारातील प्रत्यक्ष सहभागाने व्यवहार, गणिती ज्ञान आणि छोट्या उद्योगधंद्याची कल्पना वाढणार आहे. शाळेतील शिक्षक तालुका, जिल्हा व राज्य पुरस्काराने गौरविलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख वाढता आहे.-शैलेश राऊत, मुख्याध्यापक,राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त