वसई : राष्ट्रवादी काँग्रेसला आज मोठे भगदाड पडले. त्यांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते आ. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर यांच्या उपस्थितीत आज बहुजन विकास आघाडीत सामील झाले. पक्षातील स्थानिक पदाधिकारी काम करू देत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. वसई विरार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजील चाको, मुझफ्फर धन्सार व शेकडो कार्यकर्त्यांनी आज विरार येथे आ. ठाकूरांची भेट घेऊन बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. वसई विरार भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. यापूर्वी अनेकजणांनी सोडचिठ्ठी दिली होती. आज शेकडो कार्यकर्ते बसने विरार येथील विवा कॉलेज येथे आले व त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. या सर्वांचे आ. क्षितीज ठाकूर व आ. हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाचे दुपट्टे गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीपक्ष क्षीण झाला असून वसईरोड पश्चिम भागामध्ये प्रचारासाठी कार्यकर्तेही शिल्लक राहिले नाहीत. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे आम्ही हा निर्णय घेतला. पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांकडे सतत तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
By admin | Published: June 08, 2015 4:29 AM