जव्हार : पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तरुणाईने येथील प्रख्यात अशा दाबोसा धबधब्याच्या परिसराची साफसफाई करून तो चकाचक केला. त्यांच्या या उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक केले आहे. पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांना पडते. नैसर्गिक धबधब्यांची भुरळ. अशाच धबधब्यांपैकी तालुक्यातील निसर्गरम्य दाबोसा धबधबा आहे. त्यामुळे या धबधब्यावर रोज शेकडो पर्यटक येत आहेत. मात्र या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्याबाबत पर्यटकांकडून नाराजीचा सूर निघत होता. त्यामुळे जव्हार शहरातील निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्र यांनी तिथे जाऊन शुक्रवारी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील निसर्गरम्य असलेला दाबोसा धबधबा पावसाळा सुरु झाला की, पर्यटकांना भुरळ घालतो. मात्रा या धबधब्याच्या पायथ्याशी प्लास्टिक च्या पिशव्या, बियर, व्हिस्कीच्या, काचेच्या बाटल्या, कागदाचे तुकडे, पाणी बॉटल, अशी घाण सर्वत्र पसरली होती. त्यामुळे पर्यटकांना एवढ्या सुंदर पर्यटनस्थळी घाणीचे साम्राज्य पसरल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत होते. निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्र यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शुक्र वारी या परिसराची स्वच्छता करून कच-याची विल्हेवाटही लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, गुजरात, दादारनगर हवेली, या ठिकाणाहून रोज शेकडो पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे या पुढे तरी हा परिसर स्वच्छ रहावा यासाठी या परिसरात घाण, कचरा न करता, प्लॅस्टिक पिशव्या, बियर बॉटल, असा वस्तू कचरा पेटीत टाका असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे. तसेचवन्य विभागने या पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेसाठी दोन कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत व पर्यटनस्थळाचा परिसर स्वच्छ ठेवावा अशी मागणी येथे येणारे पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे सातत्याने करीत आहेत.
निसर्गप्रेमींनी केली दाबोसा धबधब्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:21 AM