वसई : यंदा कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे या वेळी नवरात्रोत्सवाची धामधूम दिसणार नाही. पारंपरिक मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी असली तरी रास-दांडिया आदी प्रकारचा गरबा खेळण्यावर मात्र प्रशासनाचे निर्बंध कायम आहेत. यामुळे नियम मोडून गृह संकुलांच्या आवारात गरब्याचे छुप्या पद्धतीने आयोजन करणारे आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. दरम्यान, वसई-विरार शहरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके सज्ज केली असल्याची माहिती वसई विभागाचे डीसीपी संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध घालण्यात आले. नवरात्रोत्सव व गरब्याचा वसई-विरार शहरात व ग्रामीण भागातही एक वेगळाच उत्साह असतो. मात्र, लॉकडाऊनमधून मिळालेली शिथिलता पाहता नवरात्रोत्सवात नागरिक एकत्र आल्यास गणेशोत्सवानंतर आलेल्या कोरोना लाटेसारखी लाट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा या वेळी अधिक सतर्क राहणार आहे. यामध्ये तक्रारच काय तर साधा व्हिडीओदेखील प्राप्त झाला तरी पोलीस कारवाई करतील, असे डीसीपी पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी गृहसंकुलाच्या आवारातील गरब्याला बंदी असून गृह संकुलांत कोरोनाचे निर्देश तोडून गरब्याचे आयोजन केल्यास आयोजक व खास करून त्या त्या हौसिंग सोसायटीच्या कार्यकारी संचालक मंडळावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा डीसीपी संजय पाटील यांनी दिला आहे.
कोरोनामुळे नवरात्र साधेपणाने साजरी करायची असून सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. कुठल्याही छोट्या-मोठ्या गृहसंकुल, हौसिंग सोसायटीत गरबे, दांडिया खासकरून डीजे, साउंड वाजवता येणार नाहीत. किंबहुना गरबे होणारच नाहीत याची दक्षता त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पथके नेमली आहेत. - संजय पाटील, डीसीपी, मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस
यंदा दुर्गामातेच्या मूर्तींमध्ये निम्म्याहून अधिक घट
कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासाठी शासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गरबाचे आयोजन न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने अनेक भाविकांनी दुर्गामातांच्या मूर्त्यांची केलेली बुकिंग रद्द केली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवातही दुर्गामातांच्या मूर्त्यांची बुकिंग रद्द झाल्याने मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला आहे. कोरोना विघ्ननामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ ओढवली आहे. गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले होते. त्यानंतरही अनेक ठिकाणी नियम डावलून नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते. नवरात्रोत्सवातही अशाच प्रकारे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना काळ असल्याने यंदा निम्म्याहून अधिक मूर्त्यांची घट झाली आहे. बुकिंगच रद्द झाल्याने मूर्ती कारागिरांना हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.