डहाणू : ऐन दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने सामान्यजणांना जगणे मुश्किल झाले आहे. डाळी, कांद यांसह विविध वस्तुंच्या वाढत्या महागाईने जनता त्रस्त असून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. या हल्लाबोल आंदोलनाचे नेतृत्व आ. आनंदभाई ठाकूर यांनी केले.केंद्रात तसेच राज्यात भाजपाची सत्ता येवून वर्ष लोटले तरी आजपर्यंत जनतेला अच्छे दिन आले नाहीत. शिधावाटप दुकानातील धान्य तसेच रॉकेल गायब झाले आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या आदिवासींना खुल्या बाजारातून महागडे धान्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसमोर दैनंदिन राहाटगाडा हाकायचा तरी कसा असा सवाल ठाकूर यांनी यावेळी केला. पक्षाच्यावतीने पारनाका ते तहसीलदार कार्यालय असा लॉँगमार्च करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने डहाणूचे तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना निवेदन देवून जनतेची भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याची मागणी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहिर शाह, युवक अध्यक्ष करण ठाकूर, शहर अध्यक्ष शमी पीरा, रमेश कर्णावट, नगरसेवक शशीकांत बारी, माजी सभापती सुरेंद्र पाटील, नगराध्यक्ष रमिला पाटील, नगरसेवीका रेणुका राकामुथा, इ. शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
डहाणूमध्ये राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन
By admin | Published: November 02, 2015 1:27 AM