पालघर : रिझर्व्ह बँकेनी जिल्हा सहकारी बँकांवर घातलेल्या अनेक निर्बंधामुळे ग्रामीण सहकारी संस्था, पतपेढ्याचा व्यवहार ढासळला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न झाल्याने त्यांना लागवडी पासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ आज पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पंतप्रधान मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी पाचश व एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी त्यांनी ५० दिवसांचा कालावधी जनते कडून मागितला होता. मात्र आज ६१ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरही चलन तुटवड्याची गंभीर परिस्थिती कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील गरीब जनतेची बँक समजल्या जाणाऱ्या सर्व सहकारी जिल्हा बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर अनेक निर्बंध घातल्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. शेतकऱ्यांना चलन तुटवड्या मुळे कर्जाची रक्कम वेळेवर मिळू न शकल्याने त्यांना रब्बीहंगामा पासून वंचित रहावे लागले आहे.कोणतीही पूर्व तयारी न करता घाईघाईनी नोटाबंदी घोषित केल्याचा परिणाम देशातील कोट्यवधी जनता भोगीत आहे.त्यामुळे जनतेला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या आणि तिला आणीबाणी सदृश्य परिस्थिती मध्ये लोटणाऱ्या भाजपा सरकारचा ह्यावेळी निषेध करण्यात आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आंदोलन आचारसंहितेच्या कारणाने रद्द करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक संजय वढावकर, सरचिटणीस अनिल गावड,तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दामोदर पाटील,महिला जिल्हाध्यक्ष निलम राऊत,मकरंद पाटील, नगरसेवक सचिन पाटील,विरेन्द्र पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरकेले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Published: January 10, 2017 5:34 AM