पारोळ : सोपारा खाडीवरील जीर्ण झालेल्या जुन्या पुलामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याचा धोका असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सोपारा खाडीवर नव्याने पूल बांधला आहे. जुन्या पुलामुळे झालेला मनस्ताप नागरिकांच्या लक्षात असताना आता नव्या पुलाच्या निकृष्ट बांधकामामुळे पुन्हा नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्याने चालताना पादचारी जखमी होत असल्याचे प्रकार उद्भवत आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना वारंवार मनस्तापाला सामोरे जावे लागत असून नायगाव पूर्वेकडील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नायगाव पूर्वेकडे राहणारे हजारो नागरिक दररोज सोपारा खाडीपुलावरून ये-जा करतात. या खाडीवर आधी असलेला लोखंडी पूल कालांतराने जीर्ण झाल्याने तो चालण्यालायक राहिला नव्हता. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जीर्ण झालेला हा खाडी पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून नागरिकांनी सोपारा खाडी पुलावर नव्याने पूल बांधण्याची मागणी केली होती. लोकभावना लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने सोपारा खाडी पुलावर नवीन पूल बांधला आहे.
मात्र सद्यस्थितीत पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या अर्धवट बाहेर आल्याने पादचाऱ्यांना पुलावरून चालताना त्रास होत आहे. कधी कधी घाईगडबडीत असलेल्या पादचाºयांचे बाहेर आलेल्या सळ्यांकडे लक्ष जात नसल्याने त्या सळ्या लागून दुखापत होत असल्याचे प्रकार घडतात. सळ्यांमध्ये पाय अडकून खाली पडल्याने पादचाºयांना दुखापत होते. तसेच नवीन पुलाला अनेक पायºया असल्याने वृद्धांना या पायºया चढताना नाकी नऊ येते.